८ व्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलचे ११ ते १५ जानेवारी २०२३ दरम्यान आयोजन ; दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते आज उदघाटन

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि. ११     

छत्रपती संभाजीनगर | जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठवाड्यातील रसिकांपर्यंत पोहोचवणार्या आठव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची घोषणा करण्यात आलेली असून बुधवार, दि. ११ ते रविवार, दि. १५ जानेवारी २०२३ या दरम्यान हा महोत्सव आयनॉक्स थिएटर, प्रोझोन मॉल, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलावंताच्या मांदियाळीत संपन्न होणार आहे. फिल्म फेस्टिव्हलचा उद्घाटन सोहळा बुधवारी, दि. ११ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता आयनॉक्स प्रोझोन, स्क्रिन क्र. ४ येथे संपन्न होणार आहे. या फेस्टिव्हलचे उद्घाटन प्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते होणार आहे.

या प्रसंगी सुचना व प्रसारण मंत्रालय भारत सरकारचे प्रधान सचिव अपुर्व चंद्रा (आय.ए.एस.) प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असणार आहेत. यंदाचा पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार प्रसिध्द दिग्दर्शक व चित्रपट अभ्यासक अरूण खोपकर (मुंबई) यांना त्यांच्या भारतीय सिनेमातील अतुल्य योगदानाबद्दल मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे, अभिनेते किशोर कदम (सौमित्र), दिग्दर्शक समीर पाटील, निर्माते नितीन वैद्य, दिग्दर्शक गिरीश मोहिते, अभिनेते उमेश कामत, संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ.विलास सपकाळ, कुलसचिव डॉ.आशिष गाडेकर, फेस्टिव्हल डिरेक्टर अशोक राणे, फेस्टिव्हल आर्टिस्टिक डिरेक्टर चंद्रकांत कुलकर्णी, मनजीत प्राईड ग्रुपचे राजेंद्रसिंग राजपाल व नवीन बगाडिया, प्रोझोनचे सेंटर हेड कमल सोनी, आयनॉक्सचे सिध्दार्थ मनोहर उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन सोहळ्यानंतर यावर्षीची जागतिक पातळीवरील नावाजलेली स्पॅनिश फिल्म आय हॅव इलेक्ट्रिक ड्रिम्स फेस्टिव्हलची ओपनिंग फिल्म म्हणून प्रदर्शित केली जाणार आहे.

नाथ ग्रुप, महात्मा गांधी मिशन व यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्र छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) प्रस्तुत व मराठवाडा आर्ट कल्चर व फिल्म फाउंडेशन आयोजित अजिंठा वेरूळ इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल हा महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने संपन्न होत असून मनजीत प्राईड ग्रूप व प्रोझोन मॉल यांचे विशेष सहकार्य या फेस्टिव्हलला मिळालेले आहे. एनएफडीसी,सूचना व प्रसारण मंत्रालय,भारत सरकार व सांस्कृतिक कार्य विभाग,महाराष्ट्र शासन यांची सहप्रस्तुती असणार आहे. नाथ स्कूल ऑफ बिजनेस मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी (एनएसबीटी), अभ्युदय फाउंडेशन हे या महोत्सवाचे सहआयोजक आहेत. एमजीएम स्कूल ऑफ फिल्म आर्टस या महोत्सवाचे नॉलेज पार्टनर आहेत.

अजिंठा वेरूळ इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलच्या आयोजनामागील उद्देश

जागतिक दर्जाचे सर्वोत्त्कृष्ट चित्रपट मराठवाड्यातील रसिकांपर्यंत पोहोचावेत, चित्रपट दिग्दर्शक, तंत्रज्ञ, कलावंत व युवा पिढीतील सिनेमाची आवड असणार्या कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, कला व तांत्रिक पातळीवर चित्रपटाचे रसग्रहण होत चित्रपट जाणिवा अधिक सशक्त व समृद्ध व्हाव्यात, मराठवाडा व छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) चे नाव चित्रपटाच्या निर्मितीच्या अंगाने सांस्कृतिक केंद्र म्हणून व चित्रपट निर्मितीचे केंद्र म्हणून जागतिक पातळीवर पोहोचावे, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) शहरातील पर्यटन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील पर्यटकांपर्यंत पोहोचावे, मराठवाडा विभागातील गुणवंत कलावंतांना चित्रपट दिग्दर्शक, चित्रपट विषयातील तज्ज्ञ व तंत्रज्ञांपर्यंत पोहोचता यावे, त्यांच्यासोबत संवाद साधता यावा तसेच आताचा मराठी सिनेमा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचावा, हे या महोत्सव आयोजनामागील उद्देश आहेत.

भारतीय सिनेमा स्पर्धा :

महोत्सवाच्या पाच दिवसांच्या कालावधीत भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. महोत्सवात मागील वर्षाप्रमाणे स्पर्धा गटाचा समावेश करण्यात आलेला आहे. यात विविध भारतीय भाषांतील नऊ सिनेमांचा समावेश असून पाच राष्ट्रीय पातळीवरील ज्युरी हे प्रेक्षकांसह चित्रपट पाहणार आहेत. यातील सर्वोत्त्कृष्ट भारतीय चित्रपटाला एक लाख रुपये रोख रकमेचे सुवर्ण कैलास पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट पटकथा, सर्वोत्कृष्ट छायाचित्रण, सर्वोत्कृष्ट संकलन, सर्वोत्कृष्ट ध्वनी संकलन, सर्वोत्कृष्ट कलाकार (स्त्री/पुरुष) या वैयक्तिक पारितोषिकांचा देखील समावेश असणार आहे.

ज्युरी समितीच्या अध्यक्षा, कॅनडा येथील डॉक्युमेंटरी फेस्टिवलच्या संचालक व दिग्दर्शक ज्युडी ग्लॅडस्टोन (कॅनडा) या असणार आहे. तर ज्युरी सदस्य म्हणून राष्ट्रीय पुरस्कार विजेते साउंड डिझायनर बिश्वदिप चॅटर्जी (मुंबई), ज्येष्ठ छायाचित्रकार धरम गुलाटी (मुंबई), संकलक व दिग्दर्शक प्रिया कृष्णस्वामी (मुंबई) व प्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक संदीप सावंत (मुंबई) हे मान्यवर असणार आहेत. फिप्रेसी ही चित्रपट समीक्षकांची आंतरराष्ट्रीय संघटना आहे. फिप्रेसी भारत हे जगभरातील महोत्सवांमधून उत्तम चित्रपट निवडून त्यांना पुरस्कार प्रदान करतात. त्या पुरस्कारांना आंतरराष्ट्रीय सन्मान मानला जातो आणि अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी यंदाच्या वर्षी अतिशय अभिमानास्पद बाब अशी की, या पुरस्कार निवडीसाठी फिप्रेसीने अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची निवड केली आहे. त्यांचे तीन विशेष ज्युरी महोत्सवातील (भारतीय सिनेमा स्पर्धा  गट वगळता) इतर चित्रपटांकरीता विशेष परीक्षण करणार आहेत. या समितीचे ज्युरी अध्यक्ष एन.विद्याशंकर (बंगळूरू), रिता दत्ता (कोलकाता), मीना कर्णिक (मुंबई) हे मान्यवर या समितीत असणार आहेत.

मास्टर क्लास व विशेष परिसंवाद :

महोत्सवाच्या पाच दिवसांच्या कालावधीत चित्रपट प्रदर्शनाबरोबरच विविध कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे. गुरुवार, दि. १२ जानेवारी २०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता आयनॉक्स येथे प्रसिध्द दिग्दर्शक व पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कारार्थी अरूण खोपकर यांच्या कलर इन सिनेमा अँड एल्सवेअर या विषयावरील मास्टर क्लासचे आयोजन करण्यात आलेले आहे.

शुक्रवार, दि. १३ जानेवारी २०२३ रोजी सकाळी १०.३० वा. मार्खेज, मॅजिक अँड सिनेमा या विषयावर ज्येष्ठ पत्रकार सुनील तांबे (मुंबई) यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

शनिवार, दि. १४ जानेवारी २०२३ रोजी दुपारी २.३० वा. ओटीटी आणि कथाकथनाचे नवे आयाम या विषयावर विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या परिसंवादात प्रसिध्द अभिनेते किशोर कदम, दिग्दर्शक ज्ञानेश झोटींग, प्रसिध्द अभिनेता जितेंद्र जोशी आणि चित्रपट समीक्षक फैजल खान संवाद साधतील. या चर्चेचे संवादक दिग्दर्शक शिव कदम असतील.

कलाकारांची उपस्थिती व संवाद :

स्पर्धा विभागातील सर्व प्रादेशिक चित्रपटांचे दिग्दर्शक, कलावंत आणि तंत्रज्ञ महोत्सवात उपस्थित राहणार असून त्यांच्या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर ते प्रेक्षकांशी संवाद साधणार आहेत. तसेच महोत्सवाच्या काळात प्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक मधुर भांडारकर, दिग्दर्शक नागराज मंजुळे, दिग्दर्शक संदीप सावंत, अभिनेते व कवी किशोर कदम (सौमित्र) दिग्दर्शक समीर पाटील, निर्माते नितीन वैद्य, अभिनेत्री सई ताम्हणकर, श्वेता बसू प्रसाद, सोनाली कुलकर्णी, अभिनेता जितेंद्र जोशी, उमेश कामत, पुष्कर जोग, दिग्दर्शक सारंग साठे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

मराठवाडा शॉर्ट फिल्म स्पर्धा :

महोत्सवात मराठवाड्यातील लघुपट निर्मिती करणार्या कलाकारांसाठी शॉर्ट फिल्म स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या स्पर्धेला मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद लाभला. स्पर्धेतील अंतिम फेरीसाठी निवडलेल्या शॉर्ट फिल्म शॉर्टफिल्म महोत्सवादरम्यान दाखविण्यात येतील. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्मला रु. २५,०००/- रकमेचे रोख पारितोषिक व सिल्व्हर कैलासा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

एमजीएम स्कूल ऑफ फिल्म आर्टसची प्रस्तुती-

अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून पायाभरणी झालेल्या एमजीएम स्कूल ऑफ फिल्म आर्टसच्या विद्यार्थ्यांनी निर्मिती केलेल्या पाच लघुपटांचे व प्राचार्य रा.रं. बोराडे यांच्या पाचोळा या प्रसिध्द कादंबरीवर आधारित पाचोळा या चित्रपटाच्या ट्रेलरचे प्रदर्शनसुध्दा या महोत्सवादरम्यान करण्यात येणार आहे.

पोस्टरचे कलात्मक सादरीकरण व प्रदर्शन :

महोत्सवादरम्यान सिनेसृष्टीतील महान दिग्दर्शक सत्यजित रे यांच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांच्या चित्रपटांवर आधारीत पोस्टरचे कलात्मक सादरीकरण व प्रदर्शनाचे आयोजन दि. ०७ ते १५ जानेवारी २०२३ दरम्यान प्रोझोन मॉल, औरंगाबाद येथे करण्यात येणार आहे. यामध्ये सत्यजित रे यांच्या गाजलेल्या चित्रपटातील सेटच्या प्रतिकृती, दुर्मिळ छायाचित्र, सिने कारकिर्दीवर आधारीत जीवनपट इत्यादीचा समावेश असेल.

चित्रपट रसग्रहण कार्यशाळा :

फिल्म फेस्टिव्हलमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा याकरिता छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)  शहरात पंचवीस महाविद्यालयांमध्ये चित्रपट रसग्रहण कार्यशाळांचे आयोजन चित्रपट समिक्षकांच्या उपस्थितीत दि. ६ जानेवारी ते ११ जानेवारी २०२३ दरम्यान करण्यात आलेले आहे.

प्रतिनिधी नोंदणी :

फिल्म फेस्टिव्हलला उपस्थित राहण्याकरीता प्रतिनिधी नोंदणीची सुरूवात करण्यात आलेली असून जगातील व देशातील सर्वोत्कृष्ट सिनेमे रसिकांना बघता यावे, याकरीता सर्वसामान्य नागरिकांकरीता केवळ पाचशे रुपये कॅटलॉग शुल्क आकारण्यात येणार आहे, तर ज्येष्ठ नागरिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात केवळ तीनशे रुपयांत या फेस्टिव्हलचा आनंद घेता येणार आहे. प्रतिनिधी नोंदणी सुरुवात झाली असून १) आयनॉक्स, प्रोझोन मॉल २) आयनॉक्स, तापडीया सिडको ३) आयनॉक्स, रिलायन्स मॉल ४) नाथ ग्रुप, कॉरर्पोरेट ऑफिस, पैठण रोड ५) एमजीएम स्कूल ऑफ फिल्म आर्टस, एमजीएम परीसर ६) निर्मिक ग्रुप, व्यंकटेश मंगल कार्यालयासमोर, सुतगिरणी रोड ७) हॉटेल स्वाद, उस्मानपुरा ८) हॉटेल नैवेद्य, सिडको बसस्टॅण्ड ९) साकेत बुक वर्ल्ड, औरंगपुरा १०) वरद सलोन, कॅनॉट प्लेस ११) वरद सलोन, निराला बाजार १२) वरद सलोन, रेल्वेस्टेशन रोड १३) ए.एम.एफ जिम, प्रताप नगर १४) हाईड आउट लॉन्ज, एसएफएस समोर १५) वाबी-साबी रेस्टॉरन्ट, बीड बायपास रोड १६) झोस्टेल, क्रांतीचौक या केंद्रांवरती चित्रपट रसिकांना प्रतिनिधी नोंदणी करता येईल.

समारोप सोहळा :

फेस्टिव्हलचा समारोप सोहळा रविवार, दि. १५ जानेवारी २०२३ रोजी सायं. ७ वाजता आयनॉक्स प्रोझोन मॉल येथे संपन्न  होणार आहे. छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) शहरात जी-२० गटाच्या दोन बैठका संपन्न होणार आहेत. या दोन्ही बैठका डब्ल्यु २० (वुमेन २०) विभागाशी संबंधित आहेत. या समितीच्या राष्ट्रीय अध्यक्षा व संगीत नाटक अकादमी, भारत सरकार (नवी दिल्ली)च्या प्रमुख डॉ. संध्या पुरेचा या समारोप सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असणार आहेत. तसेच सांस्कृतिक कार्यविभाग महाराष्ट्र शासनाचे प्रधान सचिव विकास खरगे, सांस्कृतिक कार्य संचालक बिभिषण चवरे, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)  शहराचे पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, विशेष पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)  परिक्षेत्र के.एम. प्रसन्ना, प्रसिध्द अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, प्रसिध्द अभिनेत्री श्वेता बसू प्रसाद, चित्रपट दिग्दर्शक प्रतिमा जोशी, अभिनेता पुष्कर जोग, मनजीत प्राईड ग्रुपचे नितीन बगाडिया आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर आठव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव समारोपची फिल्म म्हणून इराण येथील नो बीअर्स (इराण/२०२२) ही प्रसिध्द दिग्दर्शक जफर पनाही यांची फिल्म दाखविण्यात येणार आहे.

संयोजन समिती :

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) चे नाव चित्रपट क्षेत्रात जागतिक व्यासपीठावर नेणार्या या महोत्सवात मराठवाड्यातील नागरिकांनी सहभाग नोंदवावा तसेच अधिक माहितीसाठी www.aifilmfest.in या वेबसाईटवर तसेच info@aifilmfest.in या ई-मेल आयडीवर संपर्क साधावा, असे आवाहन संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, एमजीएम विद्यापीठाचे कुलपती तथा यशवंतराव चव्हाण सेंटर, औरंगाबाद जिल्हा केंद्राचे अध्यक्ष अंकुशराव कदम, सचिन मुळे, सतीश कागलीवाल, महोत्सवाचे डायरेक्टर अशोक राणे, आर्टिस्टीक डायरेक्टर चंद्रकांत कुलकर्णी, डॉ. अपर्णा कक्कड, आकाश कागलीवाल, डॉ. आशिष गाडेकर,  महोत्सवाचे संयोजक नीलेश राऊत, क्रियेटिव्ह डायरेक्टर शिव कदम, जयप्रद देसाई, ज्ञानेश झोटींग, सुहास तेंडूलकर, डॉ. रेखा शेळके, प्रा. दासू वैद्य, डॉ. आनंद निकाळजे, डॉ. मुस्तजीब खान, मंगेश मर्ढेकर, शिवशंकर फलके, सुबोध जाधव, डॉ. कैलास अंभुरे,  महेश अचिंतलवार, निखिल भालेराव आदींनी केले आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!