अन्नदान, वाहन रॅली, अभिवादन आदी कार्यक्रमांनी साजरी होणार शिवजयंती
शिवजन्मोत्सव समिती अध्यक्ष प्रवीण जाधव यांची माहिती

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि.४
छत्रपती संभाजीनगर | शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने १७ ते १९ फेब्रुवारीदरम्यान अन्नदान, वाहन रॅली, स्वच्छता अभियान, शहरात विविध ठिकाणच्या शिवस्मारकास अभिवादन, लोकप्रतिनिधींचा सत्कार आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष तथा फेडरेशन ऑफ इंजिनिअर्स असोशिएशनचे राज्याध्यक्ष प्रवीण जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शिवजयंतीनिमित्त १७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता संत भगवानबाबा अनाथाश्रमात अन्नदान करण्यात येणार आहे. १८ रोजी सकाळी १० वाजता क्रांती चौक ते वेरुळ अशी वाहन रॅली काढण्यात येईल, वेरूळ येथील शहाजीराजे भोसले गढी येथे स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. दुपारी तीन वाजता शहरातील ११ ठिकाणच्या शिवस्मारकास दुग्धाभिषेक तर सायंकाळी ७ वाजता क्रांती चौकात दिपोत्सव व रात्री १२ वाजता पाळणा आणि आतिषबाजी करण्यात येणार आहे. तसेच १९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्मारकास अभिवादन करण्यात येईल. याठिकाणी पोवाडा सादरीकरण, अन्नदान होईल. तर दुपारी ४
वाजता शहर, जिल्ह्यातील नवनिर्वाचित आमदार, खासदार, मंत्री यांच्या सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन घाटीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजेंद्र दाते पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जलसंपदाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार, पोलिस आयुक्त प्रवीण पवार, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष तथा जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता विजय घोगरे यांची विशेष उपस्थिती राहणार असल्याचे जाधव यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला शिवजन्मोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष नितीन कदम, सचिव निवृत्ती डक, स्वागताध्यक्ष जे. जे. रुग्णालयाचे संचालक डॉ. जीवन राजपूत, कार्यध्यक्ष अर्थतज्ज्ञ तथा उद्योजक डॉ. डी. एस. काटे, मनीषा भन्साळी, सचिव राखी सुरडकर, अॅड. सुवर्णा मोहिते आदींची उपस्थिती होती.