मिनी मंत्रालय म्हणजेच जिल्हा परिषद निवडणुकीच्या गट, गण रचनेचा कार्यक्रम जाहीर
१४ जुलैपर्यंत गट-गणांच्या रचनेची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि. १४
छत्रपती संभाजीनगर | मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या आणि तब्बल तीन वर्षे लांबलेल्या जिल्हा परिषदा, तसेच पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी शासनाने पाऊल उचलले असून, गट व गणांच्या रचनेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी १४ जुलैपर्यंत गट-गणांच्या रचनेची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशामुळे ग्रामीण भागामंध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून इच्छुक उमेदवारांनी गुडघ्याला बाशिंग बांधत गावभेटीवर जोर देत ग्रामस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधने सुरु केले आहे.
राज्यातील जवळपास सर्वच जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांचा कार्यकाळ २० मार्च २०२२ रोजी संपलेला आहे. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून मिनी मंत्रालयांवर प्रशासकराज आहे. गेल्या आठवड्यात महापालिका निवडणुकांच्या प्रभाग रचनेबाबत अध्यादेश निघाल्यानंतर जिल्हा परिषदा व पंचायत समित्या निवडणुकांकडे लक्ष लागले होते. दरम्यान, राज्यातील ३२ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत असलेल्या ३३६ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता गट-गणांच्या रचनेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यानुसार गट-गण रचनेची जिल्हाधिकारी यांनी १४ जुलैपर्यंत अधिसूचना प्रसिद्ध करणे, २१ जुलैपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडे हरकती व सूचना सादर करणे, प्राप्त झालेल्या हरकतींच्या आधारे अभिप्रायासह २८ जुलैपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव सादर करावा, तर विभागीय आयुक्तांनी प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर सुनावणी घेऊन ११ ऑगस्टपर्यंत निर्णय घ्यावा, तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी १८ ऑगस्टपर्यंत अंतिम गट-गण रचना मान्यतेसाठी राज्य निवडणूक आयोग किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांकडे सादर करावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.