प्लास्टीक जगातली सर्वात आश्चर्यकारक वस्तू, भारताला उद्योगाची मोठी संधी ; प्लास्टीक उद्योगाची शीर्ष संघटना प्लेक्स कॉन्सीलच्या परिसंवादात सूर ; दुसऱ्या दिवशी 24 हजार 750 जणांची प्रदर्शनाला भेट

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि. ६
छत्रपती संभाजीनगर | प्लास्टीकबाबत जगभरात चूकीच्या धारणा आहेत. ते पर्यावरणाला घातक आहे, त्याचे लवकर विघटन होत नाही अशा अनेक समस्या प्लास्टिकशी निगडीत आहेत. मात्र, प्रत्यक्षात प्लास्टिक जगातील एक सर्वांगसुंदर आणि आश्चर्यकारक वस्तू असून त्याच्या शिवाय दैनंदिन जीवनाची कल्पनाही करता येत नाही. फक्त याच्या पुर्नवापराबाबतचे कायदे कडक करून त्यांची कठोर अंमलबजावणी करण्याची गरज असल्याचे मत प्लास्टिक उद्योगातील मान्यवरांनी व्यक्त केले.
महाराष्ट्रातील सर्वात मोठे औद्योगिक प्रदर्शन ‘अॅडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो २०२३’ च्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी हॉल क्र.२ मध्ये दुपारी २ ते ४ दरम्यान “प्लास्टिक उद्योगातील निर्यात व व्यवसायाच्या संधी’ या विषयावर परिसंवाद रंगला. सुरूवातीला प्लास्टिक उद्योगाची शिर्ष संघटना प्लेक्सकॉन्सीलच्यावतीने तज्ञ श्रीकृष्ण आमलेकर आणि मृणाली इल्ले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. १९५५ मध्ये स्थापित प्लेक्सकॉन्सीलचे २७०० सदस्य आहेत. परिसंवादात श्रिसुंदू मुखर्जी, प्रथितयश उद्योजक सुनील रायथठ्ठा तसेच बीपीसीएल, एचपीसीएल, इंडीयन ऑईल, गेल आणि माझगाव डॉक्सचे प्रतिनिधी सहभागी झाले. त्यांच्याशी मसिआचे किशोर राठी आणि मनिष अग्रवाल यांनी संवाद साधला.
३ लाख कोटीची वार्षिक उलाढाल
श्रीकृष्ण आमलेकर म्हणाले, प्लास्टीकच्या उत्पादनाला १८५७ मध्ये सुरूवात झाली. मात्र, गेल्या ६० वर्षात याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. भारतात १९५० मध्ये वर्षाकाठी १.५ दशलक्ष टन प्लास्टिकचा वापर व्हायचा. २०२० मध्ये तो ३६७ दशलक्ष टनावर पोहचला आहे. या व्यवसायात वार्षिक ८.२ टक्के वाढ होत आहे. भारताच्या प्लास्टिक व्यवसायाची वार्षिक उलाढाल ३ लाख कोटी रुपये एवढी आहे. भारतात प्रती व्यक्ती प्रती वर्ष १८ ते १९ किलो प्लास्टिकचा वापर होतो. एवढे करूनही भारताचा निर्यातीतील वाटा अवघा १.१ टक्का आहे. यात दरसाल ११ टक्के वाढ होत आहे. या क्षेत्रात देशांतर्गतसह निर्यातीमध्ये भारतीय उद्योगांना मोठी संधी आहे. भारताची प्लास्टिकची निर्यात २०२५ पर्यंत २५ अब्ज अमेरिकी डॉलर्सवर नेण्याचे उद्धिष्ट आहे. सद्या २२ टक्के निर्यातीसह चीन जगातील सर्वात मोठे प्लास्टिक उत्पादक राष्ट्र असल्याची माहिती आमलेकर यांनी दिली.
प्लास्टिकची अनोखी दुनिया
प्लेक्सकॉन्सीलच्या मृणाली इल्ले म्हणाल्या, प्लास्टिकच्या अत्यंत मर्यादीत वापराबाबत आपण जाणून आहोत. पण याचा शेती, वैद्यकीय, टेक्सटाईल, ऑप्टीक, हॉर्टीकल्चर, इलेक्ट्रीकल, पॅकेजींग आणि दैनंदिन वापराच्या वस्तू तयार करण्यासाठी उपयोग होतो. लोकं प्लास्टिकचे नाव घेताच नाक मुरडतात. ते यापासुन होणाऱ्या प्रदूषणामुळे. मात्र, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियमांचे काटेकोर पालन केले तर याच्यासारखे दुसरे काहीच नसल्याचे मत त्यांनी मांडले. प्लास्टिक उद्योगाच्या भरभराटीसाठी संशोधन व विकासाकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे त्या म्हणाल्या.
निर्यातीकडे लक्ष द्या
उद्योजक सुनील रायठठ्ठा म्हणाले, प्लास्टिक उद्योग हा उत्पादन आणि प्रक्रिया अशा दोन प्रकारात मोडतो. दोन्ही उद्योग एकमेकांवर अवलंबून आहेत. देशात ५० हजाराहून अधिक प्लास्टिक उद्योजक आहेत. पैकी ९५ टक्के सूक्ष्म, लघु आणि मध्यम श्रेणीतील उद्योग आहेत. शिवाय ३५०० हून अधिक प्लास्टिक पुर्नप्रक्रिया करणारे उद्योग आहेत. एवढेच असंघटीत क्षेत्रातील प्रक्रिया उद्योग आहेत. त्यांना संघटीत करण्याची गरज आहे. आपण प्लास्टिकच्या देशांतर्गत बाजारपेठेकडे लक्ष देतो. मात्र, प्लास्टिक निर्यातीची मोठी संधी आहे. त्यासाठी शासनाच्या भरपूर योजना आहेत. आत्मनिर्भर भारत उपक्रमात प्लास्टिक उद्योगसाकडे विशेष लक्ष देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
दुसऱ्या दिवशी भरगच्च प्रतिसाद
एक्स्पोच्या पहिल्या दिवशी सुमारे 18,200 अभ्यागतांनी प्रदर्शनाला भेट दिली. दुसऱ्या दिवशीही एक्स्पोला भरगच्च प्रतिसाद मिळाला. शुक्रवारी तब्बल 24 हजार 750 अभ्यागतांनी भेट देऊन उत्साहात भर टाकली.या प्रदर्शनात उद्योजकांसह विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय होती. एक्स्पोसाठी खास स्मार्ट सिटीतर्फे खास सिटी बसची सोय करण्यात आली आहे. त्याचा नागरीकांनी लाभ घेतला. व्यवसायासह माहितीचीही मोठ्या प्रमाणात देवाण-घेवाण झाली.
शनिवारी भरगच्च कार्यक्रमांची मेजवाणी
एक्स्पोच्या तिसऱ्या दिवशी ७ जानेवारी रोजी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हॉल क्र. १ मध्ये सकाळी ११ ते ११:२० दरम्यान “इनोव्हेशन अॅण्ड स्कील डेव्हलपमेेंट’ या विषयावर जीआयझेडचे रविशंकर कोरगल पावर पॉईंट प्रेझेंटेशन सादर करतील. ११.२० ते १२ दरम्यान “इंजिनिअरींग व आयटीआयच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन’ याबाबत केंद्र शासनाच्या कामगार व रोजगार विभागाचे समन्वयक डॉ.अनिल जाधव विचार मांडतील. १२ ते १ दरम्यान “आयटीआय व इंजिनिरींगमधील आधुनिक अभ्यासक्रम’ या विषयावर पॅनल डिस्कशनमध्ये प्रा.सतीश सुर्यवंशी, प्रा.डॉ.उल्हास शिंदे, डॉ.भालचंद्र आणि जयंत यावलकर मार्गदर्शन करतील. ३ ते ४ दरम्यान डिफेन्स सेक्टरमधील संधीबाबत शंतनु मिश्रा माहिती देतील. तर ४ ते ५ दरम्यान “ई-वाहनांच्या सुट्या भागांच्या िनर्मितीतील संधी’ याबाबत एपीजे अब्दुल कलाम विद्यापीठातील प्रॉडक्ट डेव्हलपमेंट इंजिनिअरी शिवमसिंग तोमर मार्गदर्शन करतील.
हॉल क्र.२ मध्ये १०:३० ते १०:५० दरम्यान “बिल्डींग अॅन्वेल ऑपरेटींग प्लान अॅण्ड इम्प्रुव्ह नेट प्राफीट’ या विषयावर मदन बाजपई मार्गदर्शन करतील. १०:५० ते ११:१० दरम्यान “स्टार्टअप्स आणि सूक्ष्म व लघु उद्योगांसाठी अर्थपुरवठा’ यावर बँक ऑफ महाराष्ट्रचे मुख्य व्यवस्थापक उमाकांत केसगीरे, ११:१० ते ११:३० दरम्यान “एमएसएमईसाठी सब्सीडी’ या विषयावर सीए अनुज चांडक, ११:३० ते ११:५० दरम्यान “उद्योगांसाठी सिडबीच्या योजना’ यावर भगवान चंदनानी, ११:५० ते १२:१० दरम्यान एमएसएमईच्या प्रगतीबाबत एसएमई बिझीनेसचे नितीन शर्मा, १२:१० ते १२:३० दरम्यान “उद्योगांसाठी म्युचुअल फंड्स’ या विषयावर आयसीआयसीआय प्रुडेंशीअलचे भावेश शर्मा, ३ ते ३:४० दरम्यान उद्योगांसाठी कौशल्य विकास या विषयावर इंडो जर्मन टूलरुमचे महाव्यवस्थापक आर.डी.पाटील तर ३:४० ते ४ दरम्यान ३:४० ते ४ दरम्यान रेल्वे विभागतील संधी याबाबत दमरेचे अधिकारी मार्गदर्शन करतील.
चर्चासत्रांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मसिआचे कन्व्हेनर अभय हंचनाळ, अध्यक्ष किरण जगताप यांच्यासह मसिआचे माजी अध्यक्ष, सर्व मसिआ पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य तसेच मसिआचे सदस्य असलेले उद्योजक यांनी केले आहे.